वीस वर्षांनी हनिमनाळच्या गुरु-शिष्यांची ग्रेट भेट गेट टुगेदरच्या निमित्ताने केला शिक्षकांचा आदर सत्कार

KolhapurLive


गडहिंग्लज : हनीमनाळ (ता. गडहिंग्लज) येथील २००४-०५ साली दहावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी २० वर्षांनी गुरुशिष्यांची ग्रेट भेट घडवून आणली. गडहिंग्लज येथे आयोजित केलेल्या गेट टुगेदरच्या निमित्ताने शिक्षकांचा आदर सत्कार केला. या कार्यक्रमात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मोहन गिरी या विद्यार्थ्याने स्वागत व प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांच्या हस्ते शिक्षकांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर मोहन गिरी यांची कोल्हापूर जिल्हा कॅटरर्स असोसिएशनच्या खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनींना फेटे बांधून सत्कार करण्यात आला.

वीस वर्षापुर्वीचा काळ खडतर, सामान्य परिस्थिती, सोयींचा अभाव असूनही विद्यार्थी-विद्यार्थीनी शिक्षण घेतले. आज प्रत्येकजन आपापल्या कलेनुसार, ऐपतीनुसार, शिक्षणानुसार वेगवेगळ्या क्षेत्रात नैपुण्य मिळवून सुखी असल्याचे पाहून शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. भैरापूर, शेकीन हसुर येथून उन्हात, पावसात चालत विद्यार्थी शाळेला येत होते. प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन आज विद्यार्थी कोल्हापूर, पुणे, मुंबई, फलटण, बेळगाव यासह विविध ठिकाणी नावलौकिक मिळवत आहेत ही समाधानाची गोष्ट असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. तर काबाड कष्ट करुन शिकलेल्या मुली नेटाने आपला संसार करत असल्याबद्दलही समाधान व्यक्त करण्यात आले. मोहन गिरी या विद्यार्थ्याने कोल्हापूर येथे धनश्री कॅटरींग सव्र्व्हसेस हा व्यवसाय उच्च स्थानावर नेऊन ठेवला आहे. काही विद्यार्थी आय. टी. पोल्ट्री बांधकाम, कापड व्यवसाय, शेती क्षेत्रात कार्यरत आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन राजू कुरळे, महेंद्र कुंभार, विद्या सुतार, अलका कुंभार, मेघा मांगले यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थीनींनी केले. कार्यक्रमास के. बी. चव्हाण, डी. के. कुंभार, अनिल कांबळे, प्रदीप पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.