चंदगड : अथर्व कंपनी, जिल्हा मध्यवर्ती बँक व दौलत व्यवस्थापन यांच्यातील कराराप्रमाणे अथर्व इंटरट्रेड कंपनीला ३९ वर्षांसाठी चालवण्यास दिला आहे. अथर्वने सुमारे १६२ कोटींची देणी स्वीकारली आहेत. त्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची रक्कम २४ कोटी १५ लाख रूपये आहे. ही रक्कम जवळपास १३ वर्षे थकीत राहिली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना तातडीने व्याजासह मिळावी, यासाठी ब्लॅक पँथर संघटनेमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी राज्य साखर आयुक्तांना पाठवले होते. साखर आयुक्तांनी आता थकीत बिले अदा करण्याबाबत सर्व संबंधितांची बैठक मंगळवारी ५ रोजी दुपारी १ वाजता कोल्हापूरच्या विभागीय साखर सहसंचालक कार्यालयात बोलवण्यात आली आहे.
थकीत ऊस बिले अथर्वने करारात मान्य केल्याप्रमाणे व्याजसह शेतकऱ्यांना विनाविलंब अदा करावीत, यासाठी कार्वे येथे शेतकऱ्यांची बैठक झाली या बैठकीत थकीत ऊस बिलासह करारातील इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. आजी व माजी कामगारांची देणे देण्याबाबत अथर्वचे प्रशासन दिरंगाई करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची व कामगारांची देणे प्रलंबित ठेवणे अन्यायकारक असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली ५ मार्च नंतर शेतकरी व कामगारांची देणी
अदा केली नाहीत तर त्यासाठी चळवळ उभी केली जाईल, अशीही भावना व्यक्त केली. बैठकीला प्रा. एन. एस. पाटील, ब्लॅक पँथर संघटनेचे अध्यक्ष सुभाष देसाई, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष व्ही. एस. कार्वेकर, शामराव मुरकुटे, एम. एम. तुपारे, गोविंद पाटील, पांडुरंग बेनके, ए. टी. कागणकर, अश्विन पाटील उपस्थित होते. शेतकऱ्यांनी विभागीय साखर सहसंचालकांच्या कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर कार्यालयावर उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.