गडहिंग्लज, ता. ७ : शिप्पूर तर्फ आजरा (ता. गडहिंग्लज) येथील शामराव बाळू चाळक (वय ६७) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. शिप्पूर गावातील हे दुसरे तर चळवळीतील ८९ वे नेत्रदान ठरले. पाच वर्षांनंतर झालेल्या नेत्रदानामुळे शिप्पूरमध्ये चळवळीला गती मिळण्यास मदत झाली आहे.
शामराव चाळक यांना सोमवारी (ता.६) सकाळी दहाच्या सुमारास हृदयविकाराचा धक्का बसला. उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. गावातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना नेत्रदानाबाबतची माहिती दिली. कुटुंबीयांनी संमत्ती दिल्यानंतर येथील अंकूर आय बँकेच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने शिप्पूर येथे जाऊन नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली. चाळक यांच्या नेत्रदानामुळे चळवळीला गती मिळण्यास मदत झाली आहे.
शामराव चाळक विकास सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.