निधनाच्या एक दिवस आधीच सतीश कौशिक खेळलेले होळी, गावी गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला अन्…

KolhapurLive


प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झालं आहे. ६६ व्या वर्षी त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट करत सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

निधनाच्या एक दिवस आधी सतीश कौशिक यांनी होळी सेलिब्रेशन केलं होतं. बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबर त्यांनी रंगाची उधळणही केली होती. होळीचे फोटो सतीश कौशिक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले होते. “रंग आणि आनंदाची उधळण करणारा सण. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. जावेद अख्तर यांची जुहू येथील होळी पार्टी. अली फझल आणि रिचा चड्ढा या नवविवाहित जोडप्याचीही भेट झाली.”, असं कॅप्शन त्यांनी पोस्टला दिलं होतं. निधनाच्या काहीच तासांपूर्वी केलेली सतीश कौशिक यांची होळीची पोस्ट शेवटची ठरली आहे.

सतीश चंद्र कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये झाला. ते प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक होते. १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं. ‘रूप की रानी’ चोरों का राजा, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते है’ आणि ‘तेरे नाम’ यासारख्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे.

दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी चित्रपटात काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘मिस्टर इंडिया’, ‘दीवाना मस्ताना’, ‘साजन चले ससुराल’सह या चित्रपटांतील त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. कंगना रणौतचा ‘एमर्जन्सी’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांनी जगजीवन राम यांची भूमिका साकारली आहे.