भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात क्रिकेटचे हे ७५वे वर्ष आहे. उभय संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा निर्णयाक सामना अहमदाबाद येथे गुरुवारपासून (दि. ९ मार्च) खेळला जात आहे. या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी दोन्ही संघात नाणेफेक झाली. या कसोटीत भारतीय संघात फक्त एक बदल झाला, तर ऑस्ट्रेलियाने इंदोर कसोटी जिंकणाऱ्या संघासोबतच मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात झालेला एक बदल म्हणजे मोहम्मद सिराज याचे महत्त्वाच्या कसोटीतून बाहेर पडणे हे आहे.
चौथ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्माने मोहम्मद सिराजला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. चौथ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्माने आपली मोठी चूक सुधारत एका फ्लॉप खेळाडूला प्लेइंग ११ मधून काढून टाकले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने अहमदाबादमधील चौथा कसोटी सामना जिंकला तर केवळ कसोटी मालिकाच जिंकणार नाही, तर घरच्या मैदानावर सलग १६वी कसोटी मालिका जिंकून इतिहास रचणार आहे. हा सामना जिंकून भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीतही स्थान निश्चित करेल. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल केला आहे.
कर्णधार रोहितने मोहम्मद सिराजला संघातून का डावलले? यावर त्याने नाणेफेकीनंतर सांगितले की, मोहम्मद सिराज याच्या जागी मोहम्मद शमी याला संघात घेतले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर रोहित म्हणाला की, “आम्हीदेखील पहिल्यांदा फलंदाजीचाच निर्णय घेतला असता. आम्हाला माहिती आहे की, आम्हाला काय करण्याची गरज आहे. सिराजला आराम देण्यात आला आहे आणि शमीचे पुनरागमन झाले आहे. काही काळासाठी ब्रेक घेणे नेहमी चांगले असते. आम्हाला संघाच्या रूपात पुन्हा एक होऊन खेळण्याची गरज आहे.” पुढे स्पष्टीकरण देताना शर्मा म्हणाला की, “तुम्ही अनेक गोष्टींचा विचार करू शकता. पहिल्या तीन कसोटीत आम्ही जी खेळपट्टी पाहिली, ती चांगली नाहीये. मला आशा आहे की, इथे सर्व पाच दिवसांचा खेळ खेळला जाईल.”
बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये मोहम्मद सिराजला आतापर्यंत ३ सामन्यात केवळ २४ षटके टाकता आली आहेत. मोहम्मद सिराजने या काळात विशेष कामगिरी केली नाही. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोहम्मद सिराजला वगळून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संधी देण्यात आली आहे. मोहम्मद शमी सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. मोहम्मद शमीने २ कसोटी सामन्यात ७ विकेट घेतल्या आहेत. तुम्हाला सांगतो की ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने गुरुवारी भारताविरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम क्रिकेट कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.