महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, विद्यार्थी, शिक्षण, अंगणवाडी सेविका यांच्यासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी या अर्थसंकल्पाचं ‘गाजर हलवा’ असं वर्णन करत टीका केली आहे.
विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “यापूर्वीचे दोन ते तीन अर्थसंकल्प महाविकास आघाडीच्या सरकारने मांडले होते. करोनाचे संकट होतं आणि केंद्र सरकार आमच्या बाजूचं नव्हतं. प्रत्येकवेळी २५ हजार कोटींची जीएसटी थकबाकी असायची. आता सहा महिने झालं, महाशक्तीचा पाठिंबा असलेलं सरकार आलं आहे. पण, राज्य कारभार कसा चालू आहे, हे सर्व पाहत आहेत.”
“अर्थसंकल्पात सर्व समाजातील घटकांना मधाचं बोट लावण्याचं काम झालं आहे. त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झाला. अवकाळी पाऊस पडल्यावर मुंबईत गडगडात झाली, पण पाऊस पडला नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प ‘गरजेल तो बरसेल’ अशा परिस्थितीचा आहे. एका वाक्यात सांगायचं तर ‘गाजर हलवा’, असं अर्थसंकल्पाचं वर्णन करेल,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
“अर्थसंकल्पातील बऱ्याचशा आमच्या योजनांचं नामांतर करून मांडण्यात आल्या. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही आमची योजना आहे. तिच राज्यभर राबवणार आहेत. ज्या योजनांची घोषणा झाली, त्या प्रत्यक्षात कधी येतात हे पाहू. शेतकऱ्यांना हमीभाव कसा मिळणार, याबाबत अर्थसंकल्पात काही तरतूद नव्हती,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
“विधानपरिषदेत दीपक केसकर यांनी अर्थसंकल्पाचं वाचन केलं. तेव्हा त्यांनी अनेकदा पंतप्रधानांचा उल्लेख केला. मात्र, सत्तेत येत असताना पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल, अशी घोषणा केली होती. आठ-नऊ वर्षे झाली, त्याचा पत्ता नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे ‘गाजर हलवा’ अर्थसंकल्प आहे,” असा पुनरूच्चार उद्धव ठाकरेंनी केला.