गडहिंग्लज तहसीलदार दिनेश पारगे यांची बदली

KolhapurLive


गडहिंग्लज, ता. ९ येथील तहसीलदार दिनेश पारगे यांची आज बदली झाली, त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागी विटा (जि. सांगली) येथील कार्यरत तहसीलदार ऋषीकेत शेळके यांची नेमणूक केली आहे. शासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी आज हा आदेश काढला आहे.

दरम्यान, श्री, पारगे यांना अद्याप नेमणूक दिलेली नाही. त्याबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. श्री. पारगे साडे तीन वर्षे येथील तहसीलदारपदी कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी पाणंद रस्त्यांची योजना तालुक्यात चांगल्या पद्धतीने राबविली. महसूल आपल्या दारी उपक्रम अंतर्गत गावागावात विशेष मोहिमेद्वारे नागरिकांसह विद्यार्थ्यांना गरजेच्या विविध दाखल्यांचे वाटप केले. जिल्ह्यात पहिल्यांदा स्वस्त धान्य समर्पण योजना राबवून त्यांनी तालुक्यात ११ हजारांवर गरजू कुटुंबासाठी स्वस्त धान्य देण्याचा प्रयत्न केला. कोरोना कालावधीत नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संसर्ग वाढू नये म्हणून उपाययोजना राबविण्यासह महापुराच्या स्थितीत स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने मदत पोहचविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली.