खेडेतील आगीत सहा एकरांतील काजू, चिकू बागा जळून खाक

KolhapurLive

आजरा, ता. ८ : खेडे (ता. आजरा)  येथे आजरा - गडहिंग्लज मार्गालगत असलेल्या इंण्डेन गॅस गोडावून नजीकच्या शेतात आज लागलेल्या आगीत नंदकुमार देसाई व पांडुरंग कुंभार या शेतकऱ्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. सहा एकरातील परिसर जळून गेला आहे. यामध्ये काजू, आंबा व चिकूची झाडे जळालेली आहेत. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले.

आज दुपारी बारा वाजता या परिसरात आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट आजरा- गडहिंग्लज मार्गावरून ये- जा करणाऱ्या वाहनधारकांना दिसल्या. त्यांनी याबाबतची महिती संबंधित शेतकऱ्यांना दिली. शेतकरी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाणी, झाडांच्या फांद्या याचा वापर करून आग विझवण्यास सुरवात केली. वाळलेले गवत, पाला पाचोळा व रणरणत्या उन्हामुळे आग पसरत गेली. ती आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु होती. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.