सरकारच्या निर्णयामुळे काजू उत्पादक शेतकरी, उद्योजकांना दिलासा: शिवाजीराव पाटील

KolhapurLive


काजू उद्योगासाठी अर्थसंकल्पात १३०० कोटींची तरतूद; शिवाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
चंदगड प्रतिनिधी:राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये काजू प्रक्रिया उद्योगासाठी तब्बल १३०० कोटी रुपयांची भरघोस तरतूद राज्य सरकारने केली आहे. राज्य सरकारचा हा निर्णय अतिशय चांगला असून यामुळे चंदगडसह इतर भागातील काजू प्रक्रिया उद्योजकांना आणि पर्यायाने काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे नेते शिवाजीराव पाटील यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. 
       याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की गेली काही वर्षे चंदगड तालुक्यातील आजारी अवस्थेकडे जाणारा काजू प्रक्रिया उद्योग हा विविध समस्यांनी ग्रासलेला होता. प्रामुख्याने कोरोना व आंतरराष्ट्रीय बाजारात काजूची झालेली घसरण ही त्याची प्रमुख कारणे होती. चंदगड तालुक्यातील खेड्यापाड्यातील हाजारो महिलांना रोजगार मिळवून देणारा हा उद्योग अप्रत्यक्षरीत्या येथील लोकांचा आर्थिक कणाच आहे. त्यामुळे हा उद्योग वाचवण्यासाठी भरीव तरतूदीची गरज होती. हा उद्योग जर बंद पडला तर माझ्या तालुक्यातील हाजारो माता-भगिनींना बेरोजगार व्हावे लागेल, अनेक काजू व्यावसायिक, व्यापारी, काजू उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होतील. त्यामुळे वेळोवेळी मी आमचे नेते व महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे सातत्याने काजू प्रक्रिया उद्योग वाचवण्यासाठी उपयोजना करण्याची विनंती करत होतो. यामध्ये प्रामुख्याने जीएसटी परतावा सुरु करणे, व्हॅट परताव्यातील थकीत रक्कम परत मिळावी, बॅंकांकडून व्याजाची सवलत मिळावी, कर्जाची पूर्नरचना, वस्त्रोद्योग धोरणाप्रमाणे काजू उद्योगासाठी योजना, सवलतीच्या दरात वीज पुरवठा, काजू बोंडूवर प्रक्रिया करुन इथेनॉल किंवा सिएनजी निर्मितीसाठी पथदर्शी प्रकल्प, काजूचा वेगळा ब्रॅण्ड विकसित करणे अशा वेगवेगळ्या मागण्या आम्हीं देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे केल्या होत्या. त्याचबरोबर जिल्ह्याचे‌ खासदार धनंजय महाडिक यांच्याकडेही याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता. नुकतीच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी चंदगड तालुक्यात भेट दिली तेव्हाही काजू उद्योजकांच्या समस्या त्यांच्या कानावर घातल्या होत्या. या सर्व पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये या उद्योगासाठी भरीव तरतूद केली. प्रसिद्धी पत्रकाच्या शेवटी त्यांनी या निर्णयाबद्दल चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने राज्य सरकारचे आभार मानले आहेत.