- समरजित घाटगे
भाजपाला कागल तालुक्यात किंबहुना विधानसभा मतदार संघात उदंड प्रतिसाद मिळत आहे.हा वाढता प्रतिसाद पाहता ही तर कागल मधील २०२४ च्या परिवर्तनाची नांदी आहे.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी केले. माद्याळ(ता.कागल)येथे बांधकाम कामगारांना साहित्य वाटप व शेतकरी मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी निराधारांची एक हजार रुपयांची पेन्शन वाढवून दीड हजार रुपये करण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल घाटगे यांचा ग्रामस्थ व लाभार्थ्यांच्या वतीने जाहीर सत्कार केला. घाटगे म्हणाले, माद्याळ,व बेलेवाडी मासा येथील साठवण तलावासाठी तत्कालीन भाजप सरकारच्या काळात जवळपास ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर होता.मात्र विकास कामांचा डांगोरा पिटणाऱ्या हसन मुश्रीफ यांनी या दोन्ही साठवण तालावासाठी प्रयत्न केले नाहीत. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे जिव्हाळ्याच्या कामाकडे मुश्रीफ यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले. जलयुक्त शिवार समितीचे अध्यक्ष उमेश देसाई म्हणाले अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या मदतीतील दहा हजार रुपये ठेव ठेवून घेण्याचे पाप विरोधकांनी केले. ही प्रवृती थोपविण्यासाठी कोणतेही पद नसताना सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटणाऱ्या समरजित घाटगे यांना आमदार करून बळ देऊया. यावेळी संजय बरकाळे ,सागर मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले.शाहु साखरचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी स्वागत केले. करंबळीचे सरपंच अनुप पाटील, प्रताप पाटील, राजाभाऊ माळी, दिपक कुरणे , सोनुसिंह घाटगे,दत्तात्रय चव्हाण ,दिलीप तिप्पे, आदेश मेतके, प्रल्हाद तिप्पे,राजू घाटगे, रंगराव मेतके आदी उपस्थित होते. फोटो - माद्याळ येथे बांधकाम कामगारांना साहित्य वाटप व शेतकरी मेळाव्यात बोलताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे.समोर उपस्थित जनसमुदाय