भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका: विश्वचषकाच्या तयारीला प्रारंभ!

KolhapurLive


तारांकित अष्टपैलू हार्दिक पंडय़ाची नेतृत्वशैली आणि भारतीय संघाची विश्वचषकासाठी तयारी, याकडे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत सर्वाचे लक्ष असेल. या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक कारणास्तव घरच्या मैदानावर होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुकणार असून त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक नेतृत्वाची धुरा सांभाळेल. गेल्या काही काळापासून हार्दिकने भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद भूषवले असले तरी, एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून हार्दिकचा हा पहिलाच सामना असेल. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने हा सामना जिंकल्यास या वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकानंतर मर्यादित षटकांच्या संघांचा कायमस्वरूपी कर्णधार म्हणून हार्दिक आपली दावेदारी अधिक भक्कम करेल असे मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे तो या सामन्यात कर्णधार आणि खेळाडू म्हणून कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

भारतात या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय संघाने गेल्या दशकभराच्या कालावधीपासून ‘आयसीसी’ची जागतिक स्पर्धा जिंकलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपासून भारतीय संघाच्या विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात होईल. भारताने या वर्षांची दमदार सुरुवात करताना मायदेशात झालेल्या श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकांमध्ये निर्भेळ यश (प्रत्येकी ३-०) संपादन केले. ऑस्ट्रेलिया आपल्या सर्वोत्तम संघासह खेळणार आहे. त्यामुळे ही मालिका जिंकणे भारतासाठी आव्हानात्मक ठरू शकते.

कुलदीप-चहल एकत्रित खेळणार?
पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर एकदिवसीय मालिकेला मुकणार असल्याने सूर्यकुमार यादवला घरचे मैदान असलेल्या वानखेडेवर पहिला एकदिवसीय सामना खेळण्याची संधी लाभू शकेल. गोलंदाजीत ‘चायनामन’ कुलदीप यादव आणि लेग-स्पिनर यजुवेंद्र चहल ही फिरकी जोडी एकत्रित खेळणार का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.