रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध थांबवण्यासाठी अनेक देशांनी प्रयत्न केले. भारतही त्यापैकी एक देश आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी भारताचं नोबेल पुरस्कार समितीने कौतुक केलं आहे. नोबेल समितीचे उपनेते असल तोजे म्हणाले की, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लॅदिमीर पुतीन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मोदी यांनी कोणतीही धमकी न देता युद्धाच्या परिणामांबद्दल कडक संदेश दिला. आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा नेत्यांची खूप आवश्यकता आहे.”
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करताना नोबेल समितीचे नेते असल तोजे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोबेल शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार आहेत.” तोजे म्हणाले की, “पीएम मोदी हे अत्यंद विश्वासू नेते आहेत. मोदी शांतता प्रस्थापित करू शकतात. ते जगातल्या अशा नेत्यांपैकी एक आहेत जे शांततेसाठी स्वतःचं योगदान देत आहेत. मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना सांगितलं की, हे युद्धांचं युग नाही.” मोदींच्या या सल्ल्याचं तोजे यांनी कौतुक केलं.
“भारताला शांततेचा वारसा आहे, भारत महासत्ता होणार हे निश्चित”
नोबेल समितीचे नेते तोजे म्हणाले की, “भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठं योगदान देत आहेत. भारताला शांततेचा वारसा लाभला आहे, त्यामुळे भारत महासत्ता होणार हे निश्चित आहे.” तसेच तोजे म्हणाले की, “युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदी सर्वात विश्वासार्ह नेते आहेत आणि ते जगभरात शांतात प्रस्थापित करू शकतात.”
परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक आणि नोबेल शांतता पुरस्कार समितीचे सदस्य असल तोजे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “भारत एक महासत्ता होऊ शकतो.”
नोबेल शांतता पुरस्कारासाठी मोदींच्या नावाची चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळी नाही. याआधीही अनेकदा अशा चर्चा झाल्या आहेत.