चंदगड : येथील चंदगड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने दोन वर्षांत ८१ बेरोजगार तरुणांना अर्थसहाय्य करून त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत केली. ग्रामीण भागात एवढ्या प्रभावी योजना राबविल्याबद्दल कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे गौरव करण्यात आला. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते सहायक व्यवस्थापक राजाराम सुकये यांनी सत्कार स्वीकारला. बँकेने या योजनेतून आठ कोटींचे कर्ज वितरित केले. त्यातून अनेक तरुणांनी स्वतःचे उद्योग, व्यवसाय उभे केले. कर्जाच्या परतफेडीतही चोख व्यवहार राहिल्याने ग्रामीण भागात या बँकेने ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली असल्याबद्दल पाटील यांनी कौतुक केले. बँकेचा आदर्श इतर बँकांनी घ्यावा, असे आवाहन केले. येत्या काळात छोट्या उद्योजकांना दहा हजार ते दोन लाखांपर्यंत विनातारण कर्जे तीन वर्षांसाठी वितरित केली जातील. शैक्षणिक कर्जही ४० लाखांपर्यंत दिले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक आदी उपस्थित होते.