“खोके घेतले, पण घरात…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विरोधकांचा समाचार

KolhapurLive

   राज्यातील सात महिन्यांपूर्वीत मोठा सत्तासंघर्ष झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड केलं. या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं अन् शिंदे गट आणि भाजपाचं सरकार स्थापन झालं. तेव्हापासून शिंदे गटातील आमदारांवर खोके घेतल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो. याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समाचार घेतला आहे. खोके घेतले, पण घरात जमा केले नाहीत, असं विधान एकनाथ शिंदेंनी केलं आहे.
            जळगावात एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “विरोधक आरोप करत असतात. त्यांच्याकडे दोनच शब्द आहेत, तिसरा शब्दच नाही. गुलाबराव पाटलांना सरकारच्या वतीने २७० खोके दिले. चिमणआबाला ११५ खोके दिले. खोके घेतले, घरात जमा नाही केले; आम्ही दिले,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.    “जो-जो आडवा येईल, त्याचा सत्यानाश…”
“लोकं आमच्यावर खूप टीका करतात. पाच-पंधराजण खोके-खोके-खोके बोंबलत होते. आम्हीतर पक्के खोकेवाले आहोत, काय बोलायचं बोला. आज मतदारसंघात ३७० खोके दिले, राष्ट्रवादीवाल्यांना सांगा. जो उठाव केला, तो जनतेच्या काम आणि भगव्यासाठी केला. भुंकणारे भुंकूद्या, ‘हाथी चले बाजार कुत्ते भोंके हजार’ याची चिंता करायची गरज नसते. आपण कामाने उत्तर देऊ. कोणत्याही मतदारसंघात चौफेर रोड आणि पाण्याच्या कामाची कामे सुरु आहेत. याच्यासाठी आम्ही उठाव केला. जो-जो आडवा येईल, त्याचा सत्यानाश होवो,” असा हल्लाबोल मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर केला.