मोटारसायकल ओढ्यात कोसळून एक जण ठार

KolhapurLive

आजरा, ता. २२ श मोटारसायकल ओढ्यात कोसळून भावेवाडी (ता. आजरा) येथील शामराव कृष्णा  गुडुळकर  (वय ५२, रा. जेऊर, ता. आजरा) हे जागीच ठार झाले. आज दुपारी आजरा चंदगड रस्त्यावर साडेतीन वाजता ही घटना घडली. गुडुळकर हे जेऊर येथून मोटारसायकलने म्हाळुंगे (ता. चंदगड) कडे यात्रेसाठी निघाले होते. भावेवाडी येथील तीव्र उतारावर त्यांच्या मोटारसायकलवरील ताबा सुटला. मोटारसायकलसह ते पंधरा ते वीस फूट खोल ओढ्यात कोसळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा  जागीच मृत्यू झाला. श्री गुडुळकर हे मुंबई येथे व्यवसायानिमित्य  स्थायिक झाले आहेत. ते गावी घर बांधण्यासाठी आले होते. गेले वर्षभर ते गावीच होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन विवाहितत मुली, मुलगा, जावई असा परिवार आहे.