सोमवारी चेंबूर येथे झालेल्या एका संगीत कार्यक्रमादरम्यान गायक सोनू निगम आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. या घटनेत सोनू निगमला किरकोळ दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्याने चेंबूर पोलिसांत गुन्हाही दाखल केला आहे.
सोमवारी चेंबूर येथे एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सोनू निगमही उपस्थित होता. कार्यक्रम झाल्यानंतर सोनू निगम व त्याचे काही सहकारी व्यासपीठावरुन खाली उतरत असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेत सोनू निगम व त्याचा एक सहकारी जखमी झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, या घटनेनंतर सोनू निगमने चेंबूर पोलिसांत तक्रार दाखल केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू निगमला धक्काबुक्की करणाऱ्या आरोपीचं नाव स्वप्नील फेटरपेकर असल्याची माहिती पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी दिली.
यासंदर्भात बोलताना सोनू निगम म्हणाला, “कार्यक्रम झाल्यानंतर मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर व्यासपीठावरून खाली येत होतो. यावेळी एका व्यक्तीने मला धक्काबुक्की केली. यावेळी हरी आणि रब्बानी यांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी आणि रब्बानी खाली पडलो. त्याठिकाणी लोखंडी रॉड होते. कदाचित आमची जीवही गेला असता. मात्र, सुदैवाने आम्ही वाचलो. याप्रकरणी मी तक्रार दाखल केली आहे.”