क्वालिटी ऍनिमल्स फुड कामगारांचा प्रश्न भाजप नेते शिवाजी पाटील यांच्या मध्यस्थीने सुटला

KolhapurLive

चंदगड प्रतिनिधी: गेले काही दिवस राजगोळी येथील क्वालिटी फुड कंपनी मालक आणि कामगार यांच्यात सुरु असलेल्या संघर्षास अखेर पूर्ण विराम मिळाला आहे. कामगार नेते शिवाजीराव पाटील यांनी पुढाकार घेऊन कंपनी मालक व कामगार यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा घडवून आणली. या चर्चेमध्ये पाटील यांनी कामगारांच्या समस्या व बाजु मांडून कंपनी प्रशासनास आपले चूकीचे निर्णय मागे घेण्यास विनंती केली. यानंतर कंपनी प्रशासनानेही हे निर्णय तत्काळ मागे घेऊन या वादावर पडदा टाकला. यावेळी कंपनी मालक एस.एस. देशपांडे, लोकूर साहेब, डॉ.पवार, भाजप पदाधिकारी अंकुश गवस, भाऊकु गुरव, गणेश फाटक, परेश पाटील, रवी बांदिवडेकर तसेच कामगार प्रतिनिधी सागर पाटील, संदीप पाटील, राजेंद्र परिट, कंपनी अधिकारी व कामगार उपस्थित होते.
       यावेळी बोलताना पाटील म्हणाले, कामगारांचे हीत जोपासताना कंपनीही टिकली पाहिजे तर रोजगार मिळेल. जर कामगारच समाधानी नसेल तर कंपनी प्रगती करु शकणार नाही आणि जर कंपनीची प्रगती झाली नाही तर भावी पिढीसाठी रोजगार निर्मिती होणार नाही. कंपनी मालक, कंपनी प्रशासन आणि कामगार यांच्या संघर्षामुळे दोघांचेही नुकसान होते. याबाबत सविस्तर माहिती अशी की राजगोळी येथील क्वालिटी फुड कंपनीमधील काही कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले तर काही कामगारांची कंपनीच्या दुसऱ्या प्लांटवर बदली करण्यात आली. कंपनी प्रशासनाच्या या तडकाफडकी निर्णयाविरोधात संबंधित कामगारांनी जाब विचारला असता त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे सर्व कामगारांनी या चूकीच्या निर्णयाविरोधात आवाज उठविण्यासाठ सुरवात केली. कंपनी प्रशासन जुमानत नसल्याने अखेर कामगारांनी ही गोष्ट कामगार नेते शिवाजीराव पाटील यांच्या कानावर घातली व यातून मार्ग काढण्यास विनंती केली. पाटील यांनी कामगारांची समस्या लक्षात घेऊन तत्काळ कंपनी मालक, व्यवस्थापक व कंपनी प्रशासन अधिकाऱ्यांशी चर्चा केली व सकारात्मक चर्चा घडवून हा वाद मिटवला. यावेळी कंपनी कामगारांकडून शिवाजीराव पाटील यांचे आभार मानण्यात आले. 

(फोटो कॅप्शन: कंपनी कामगार शिवाजीराव पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानताना)