नेसरी: पंचायत समिती शिक्षण विभाग गडहिंग्लज व एस. एस.हायस्कूल आणि छत्रपती शिवाजी जुनिअर कॉलेज नेसरी यांच्या संयुक्त विद्यमाने ५० वे गडहिंग्लज तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन बुधवार दि. ११ ते शुक्रवार दिनांक १३ जानेवारी अखेर एस. एस. हायस्कूलच्या मैदानावर स्व.डॉ. एस. डी. पाटील विज्ञाननगरी येथे तीन दिवस भरणार आहे.
बुधवार दि.11 रोजी सकाळी १० वाजता विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाटील,तर स्वागतअध्यक्ष डॉ.अर्चना कोलेकर आहेत. प्रमुख वक्ते म्हणून शिवाजी विद्यापीठचे प्रभारी कुलगुरू डॉ. पी.एस.पाटील आहेत. यावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाचे अध्यक्ष समरजीतसिंह घाडगे, माध्यमिक शिक्षणअधिकारी एकनाथ आंबोकर उपस्थित राहणार आहेत. विज्ञान ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद माजी सदस्य हेमंत कोलेकर यांच्याहस्ते करण्यात येणार आहे
दि. 12 जानेवारी रोजी सकाळी १० वाजता तंत्रज्ञान आणि खळणी या विषयावर सलीम नदाफ यांचे व्याख्यान,तर १२ वाजता विज्ञान प्रश्नमंजुषा होणार आहे. शुक्रवार दि. 13 जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता पारितोषिक वितरण व समारोप समारंभ संस्था अध्यक्ष हेमंत कोल्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल.
यावेळी नेसरीच्या सरपंच गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर शिक्षणाधिकारी आशा उबाळे, उपशिक्षणाधिकारी बी.एस. टोपणे, गटविकास अधिकारी शरद मगर गटशिक्षणअधिकारी हलबा हालबागोळ, विस्तार अधिकारी आर.आर.कोरवी यांची उपस्थिती राहणार आहे.प्रदर्शनात तालुक्यातील हायस्कूल शाळा सहभागी होणार असून याचा लाभ घेण्याचा आव्हान पंचायत समिती व शिक्षण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.