गडहिंग्लज, ता. ९ : ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील आणाप्पा शंकर मोहिते (वय ७८) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. ऐनापूर गावातील हे सातवे तर चळवळीतील ८५ वे नेत्रदान ठरले. यापूर्वी कार्यकर्त्याच्या भूमिकेत असणाऱ्या मोहिते कुटुंबीयांनी या आदर्शवत निर्णयातून चळवळीतील कृतिशील सहभाग दाखवून दिला.
आणाप्पा मोहिते गेल्या काही दिवसापासून आजारी होते. आज पहाटे त्यांचे निधन झाले. माजी सरपंच सूर्याजी मोहिते यांचे ते वडील होत. ऐनापूर गावातनेत्रदान चळवळीचे काम सुरु झाल्यापासून सूर्याजी यांचा सक्रीय सहभाग आहे. सूर्याजी व त्यांच्या कुटुंबीयांनी आणाप्पा यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. येथील अंकूर आय बँकेच्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी ऐनापूर येथे जाऊन नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली. आणाप्पा यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी (ता.१२) सकाळी नऊला रक्षाविसर्जन आहे.