स्मारकं होतील, पुतळे उभे राहतील, तैलचित्रांचे अनावरण होतील, राजकारण होईल पण…” बाळासाहेबांचे स्मरण करत संजय राऊतांचं विधान!

KolhapurLive

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज(२३ जानेवारी) जयंती आहे. यानिमित्त आज दिवसभर शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते राजकीय नेते मंडळींकडून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेबांचे स्मरण करत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे कार्यक्रम केवळ मुंबईत नाहीत, देशभरात, जिथे जिथे मराठी माणूस आहे, पोहचलाय त्या जगाच्या कानाकोपऱ्यात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं जातं. मराठी माणसाला या मुंबई शहरात महाराष्ट्राच्या राजधानीत, त्यांनी स्वाभिमानाने, ताठ मानाने जगता यावं यासाठी ५५ वर्षे आपल्या आयुष्यातली झीज सोसली. संघर्ष केला, राजकीय लढाया केल्या, तुरुंगवास भोगला. प्रबळ सत्तेशी दिल्ली आणि महाराष्ट्रात अक्षरशा युद्ध केलं. तेव्हा कुठं ही मुंबई मराठी माणसाची होऊ शकली आणि आजही या मुंबईवर मराठी माणसाचा पगडा आहे.”

याचबरोबर, “लढत रहा, रडू नकोस, संकटाच्या छातीवर पाय रोवून उभा रहा. हा बाळासाहेब ठाकरे यांचा मराठी माणसासाठी मंत्र होता. आज जे मराठी अस्मिता म्हणून आपण जगतो आहोत, ती त्यांची देणगी आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी माणूस हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आजन्म ऋणी राहील आणि कृतज्ञ राहील.” असंही संजय राऊतांनी म्हटलं.