“लवकरच नारायण राणेंना मोदींच्या मंत्रिमंडळातून…”, शिवसेनेचा मोठा दावा; म्हणाले…

KolhapurLive

   देशात २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ‘इंडिया टुडे’ आणि सी-वोटर’चा सर्वे समोर आला आहे. या सर्व्हेत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेला ३४ जागा मिळणार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर, शिंदे गट आणि भाजपाची मोठी पिछेहाट झाली आहे. अशात केंद्रीय मंत्री नारायण राणे लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंना खोचक टोला लगावला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना विनायक राऊत म्हणाले की, “३४ मतदारसंघाची यादी पाहिली नाही. पण, कार्यकर्त्यांच्या विश्वासावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा उमेदवारी देतील, अशी अपेक्षा आहे. तसेच, नारायण राणे लोकसभा निवडणुकीत उभारले, तर अडीच लाख मतांनी त्यांचा पराभव करण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे,” असं विनायक राऊत यांनी सांगितलं.
 “केंद्रीय मंत्र्यांना स्वत:च्या खात्याचा अर्थ कळत नाही. त्यामुळे दिल्ली सोडून जिल्हा नियोजनाच्या बैठकीला येऊन बसतात. त्यांच्या खात्यातील एका निवृत्त अधिकाऱ्याला राणेंनी पुन्हा सेवेत घेतलं. त्या अधिकाऱ्याने पदाचा दुरुउपयोग करुन नारायण राणेंच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार केला,” असं विनायक राऊत यांनी म्हटलं.
तसेच, “त्या अधिकाऱ्याने दोन तरुणींची फसवणूक करुन लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे लवकरच नारायण राणेंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे,” असा दावा विनायक राऊत यांनी केला.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. यावर विचारले असता विनायक राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरे दोघांशी चर्चा करतील. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी शिवसेनेबरोबर यावी, असं शिवसैनिकांचं मत होतं. पण, दोन्हीकडून संयम ठेवण्याची आवश्यकता आहे,” असं आवाहन विनायक राऊत यांनी केलं.