ऐनापूरात झाले आठवे नेत्रदान

KolhapurLive


गडहिंग्लज, ता. २८ : ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील रत्नाबाई मारुती पालकर यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. ऐनापूर गावातील हे आठवे तर चळवळीतील ८६ वे नेत्रदान ठरले. ऐनापूरात गेल्या पंधरा दिवसात दुसरे नेत्रदान झाले आहे.
गडहिंग्लज व आजरा तालुक्यात सुरु असलेली नेत्रदान चळवळ ऐनापूर गावातही चांगली रुजली आहे. पंधरा दिवसापूर्वी आणाप्पा मोहिते यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले होते. दरम्यान, रत्नाबाई पालकर यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना गावात सुरु असलेल्या नेत्रदान चळवळीची माहिती होती. त्यांनी चळवळीतील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून रत्नाबाई यांच्या मरणोत्तर नेत्रदानाची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर येथील अंकूर आय बँकेच्या पथकाने ऐनापूर येथे जाऊन नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली. रत्नाबाई यांच्या मागे मुलगा, चार मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.