भारतीय चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचे का?
‘आरआरआर’ चित्रपटाला मिळालेले हे सोनेरी यश विविध अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचे ठरले आहे. राजामौलींचे दिग्दर्शन असलेला आणि रामचरण – एनटीआर ज्युनिअर या कलाकारद्वयीचा हा चित्रपट खरेतर मसाला किंवा मनोरंजक चित्रपटांच्या यादीत मोडणारा आहे. आत्तापर्यंत ऑस्कर वा गोल्डन ग्लोबसारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांसाठी निवडलेल्या चित्रपटांची जातकुळी वेगळी होती. आशयघन वा वैचारिक, गंभीर विषय मांडू पाहणाऱ्या चित्रपटांचा या पुरस्कारांसाठी सामान्यत: विचार केला जातो, मात्र दक्षिणेकडील अल्लूरी सीताराम राजू आणि कोमारम भीम या वास्तवातील दोन क्रांतिकारकांच्या आयुष्यावर रचलेली ‘आरआरआर’ची काल्पनिक कथा गाणी, नृत्य, ॲक्शन, देशभक्तीचा रंग अशा सगळ्या प्रकारच्या भावनिक नाट्यपूर्ण मनोरंजक आशयाचा मुलामा देत रंगवण्यात आली होती.
कथाकथनाची उत्तम शैली, व्हीएफएक्स तंत्राचा उत्तम वापर करत केलेली प्रभावी दिग्दर्शकीय मांडणी, श्रवणीय संगीत, कलाकारांचा दमदार अभिनय या सगळ्या बाजूंवर अग्रेसर ठरलेला हा चित्रपट जगभरात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्याचा आशय वैश्विकच आहे हेही ठामपणे सांगणे अवघड असले तरीही ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताकडून ‘आरआरआर’चा विचार झाला नाही, याबद्दल खुद्द हॉलिवुडच्या चित्रपटकर्मींनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे भारताकडून अधिकृतपणे नसली तरी स्वतंत्रपणे राजामौली आणि त्यांच्या चमूने आपला चित्रपट हॉलिवूड आणि ऑस्करच्या परीक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत घेतली. ‘आरआरआर’ चित्रपटाच्या हॉलिवूडमधील प्रसिद्धी-प्रदर्शनासाठी निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांनी घेतलेली मेहनत ‘गोल्डन ग्लोब’च्या रूपाने भारताला इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा जागतिक पुरस्कार मिळवून देण्यात यशस्वी ठरली आहे.
भारताचे पहिले ‘गोल्डन ग्लोब’…
गेल्या दोन दशकांत गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळवणारा आणि ‘बेस्ट ओरिजिनल सॉंग’साठी पुरस्कार मिळवणाराही ‘आरआरआर’ हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. याआधी १९८८ मध्ये ‘सलाम बॉम्बे’ आणि २००१ मध्ये ‘मॉन्सून वेडिंग’ या दोन चित्रपटांना ‘फॉरेन लँग्वेज फिल्म’ विभागात नामांकन मिळाले होते. वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही चित्रपट मीरा नायर यांनी दिग्दर्शित केले होते. मात्र या दोन्ही चित्रपटांचा आशय आणि ‘आरआरआर’चा विषय-मांडणी या दोन्हींची जातकुळी वेगळी आहे. त्यातही ‘आरआरआर’ला ‘बेस्ट नॉन इंग्लिश लँग्वेज फिल्म’ विभागात गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला असता तर इतिहास घडला असता. अर्थात ते यश पदरी पडले नसले तरी संगीतकार एम. किरवानी यांच्या संगीताची जादू ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारांच्या परीक्षक समितीला भुरळ पाडणारी ठरली हेच खरे.
आता लक्ष ऑस्करकडे…
गोल्डन ग्लोबच्या यशानंतर ‘आरआरआर’ हाच कित्ता ‘ऑस्कर’ पुरस्कारांच्या बाबतीत गिरवणार का, याची सध्या उत्सुकता आहे. ‘आरआरआर’ चित्रपट पाहिल्यानंतर खुद्द रुसो ब्रदर्सपासून स्कॉट डेरिक्सन आणि नामांकित हॉलिवूड दिग्दर्शकांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. आतापर्यंत भारतीय चित्रपटात नाच-गाणी असतात, त्यांची लांबी खूप असते, त्यामुळे त्या चित्रपटांना ऑस्कर पुरस्कारांत स्थान मिळणार नाही, अशीच हेटाळणी केली जायची. प्रत्यक्षात नाच-गाणी आणि ॲक्शनचा मुलामा असलेल्या या चित्रपटाची लांबीही मोठी असली तरी या चित्रपटाला जगभरातून मिळणारा चांगला प्रतिसाद एका अर्थी भारतीय चित्रपटकर्मींसाठीही सुखद धक्का ठरला आहे.
याआधी ‘बेस्ट ओरिजिनल साँग’ विभागातील ऑस्कर पुरस्कारावर ए. आर. रेहमान आणि गुलजार यांनी ‘जय हो’ या गाण्याच्या निमित्ताने विजयाची मोहोर उमटवली होती. त्यानंतर रसूल पोकुट्टी यांनाही ‘बेस्ट साऊंड मिक्सिंग’साठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे ‘गोल्डन ग्लोब’नंतर ‘ऑस्कर’मध्येही ‘नाटू नाटू’ होणार का हे पाहणं उत्सूकतेचं ठरणार आहे. ‘पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी’सारख्या नावाजलेल्या चित्रपटांचे निर्माते जेसन ब्लम यांनी तर ‘आरआरआर’ ऑस्कर पुरस्कार मिळवणार असे भाकितही जगजाहीर करून टाकले आहे. आता हॉलिवुडमध्ये किमान इतके भरभरून कौतुक होत असताना खरोखरच त्याची परिणती ऑस्कर विजयश्रीमध्ये होते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.