आजरा, ता.१२ : सुप्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांच्या हस्ते लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्काराचे वितरण होणार आहे. येथे रविवारी (ता. २२) पुरस्कार वितरण होईल. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ शाहिरीने सर्वदूर नेणारे लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार काॅ. कृष्णा मेणसे यांना जाहीर झाला, अशी माहिती पुरस्कार समितीचे कार्याध्यक्ष काॅ. संपत देसाई यांनी दिली.
डॉ. जयसिंगराव पवार यांनी जिद्दीने आणि परिश्रमाने इतिहास संशोधक अशी ओळख निर्माण केली. छत्रपती राजाराम महाराज आणि मराठा स्टेट (राज्य) विषयावर पीएचडी करून राजाराम महाराजांच्या मुत्सद्देगिरीवर प्रथम प्रकाशझोत टाकला. त्यांना पुरस्कार प्रदानासाठी निमंत्रित केले आहे. या वेळी सर्वश्री आमदार हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील उपस्थिती असेल. यावेळी अध्यक्ष रवींद्र आपटे, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, मुकुंददादा देसाई, राजाभाऊ शिरगुप्पे, डॉ नवनाथ शिंदे, सुनील पाटील, संजय घाटगे, काशिनाथ मोरे, कृष्णा सावंत उपस्थित होते.