शिवाजी पार्क आणि आझाद मैदानात ‘जन आक्रोश’; दोन मोठ्या मोर्चांनी मुंबई दणाणणार; काय आहेत मागण्या?

KolhapurLive

मुंबईत आज दोन मोठे मोर्चे निघणार आहेत. त्यामुळे मुंबई ढवळून निघणार आहे. आज सकल हिंदू समाजाकडून दोन हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यातील एक मोर्चा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरून सुरू होईल आणि कामगार मैदानावर पार पडणार आहे. तर दुसरा मोर्चा हा लिंगायत समाजाचा असेल. लिंगायत समाजाकडून विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. लव्ह जिहाद ते लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यासाठी हे मोर्चे काढण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन मोठ्या मोर्चांनी मुंबई दणाणून जाणार आहे.

लव्ह जिहादचे प्रकार रोखण्यात यावेत व धर्मांतर कायदा देशात लागू करावा, या मागणीसाठी आज मुंबईत सकल हिंदू समाजामार्फत हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय. दादर येथील शिवाजी पार्कमधून 10 वाजता मोर्चाला सुरवात होईल व कामगार मैदान येथे मोर्चाची सांगता होईल. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कामगार मैदान परिसरात पोलिसांचा पॉईंट टू पॉईंट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मैदानात बॅनर्सही लावण्यात आले आहेत.

या आहेत मागण्या

श्रद्धा वालकर हत्याकांडचा आरोपी आफताबला जन्मठेप व्हावी, लव्ह जिहाद विरोधी कायद्याची अंमलबजावणी आणि धर्मांतरण कायदा देशात लागू व्हावा म्हणून हा मोर्चा काढण्यात येत आहे. त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचंही नियमन करण्यात आलं आहे.

लिंगायत समाजाचा महामोर्चा

दरम्यान, लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासाठी आज मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये धर्मगुरूंसह लिंगायत समाजातील नेते मंडळी सहभाग होणार आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यातील 10 हजार लिंगायत समाजबांधव या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती लिंगायत समन्वय समितीचे राज्य महासचिव यांनी दिली.

तसेच या राज्यव्यापी मोर्चामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र व तेलंगणा राज्यातील समाजबांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आझाद मैदानावर सकाळपासूनच लिंगायत समाजाचे बांधव जमा होताना दिसत आहेत.