गडहिंग्लज : चिंचेवाडी (ता.गडहिंग्लज) गावच्या हद्दीतील शेतवडीमध्ये लांडग्याने शेळ्यांवर हल्ला केला. त्यात एक बोकड व तीन शेळ्या ठार झाल्या. बुधवारी (ता.७) सायंकाळी पाचला ही घटना घडली. या घटनेने परीसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. आज सकाळी या हल्ल्याची माहिती मिळताच वनरक्षक रणजीत पाटील यांनी पशुवैद्यक डॉ. अरुण मनगुतकर यांच्यासह घटनास्थळी भेट दिली . याबाबतची माहिती अशी , बाजीराव कुरळे हे गडहिंग्लज - हसुरवाडी रोडवरील एसजीएम कॉलेजपासून वैरागवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर शेतवडीत राहतात. त्यांच्या एका बोकडसह चार शेळ्या होत्या.काल सायंकाळी एका बोकड व तीन शेळ्या बाहेर बांधलेल्या असताना लांडग्याने त्यांच्यावर हल्ला करून ठार केल्याची माहिती कुरळे यांनी वनविभागाला दिली . त्यानंतर वनरक्षक पाटील व डॉ. मनगुतकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पंचनाम्यात कुरळे यांचे २५ हजारांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.