“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी…”; शिवरायांबद्दल बोलताना अमोल कोल्हेंचा माईक बंद केल्याने NCP चा हल्लाबोल

KolhapurLive

राज्यात घडणाऱ्या सगळ्या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत जे काही आहे ते कर्नाटकचे मुख्यमंत्रीच बोलत आहेत. असा प्रकार महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही. सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे त्याच्या तारखा लागतील पण हे चित्र जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न कर्नाटकचे मुख्यमंत्री करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे नाहीतच ते भाजपचेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे ते कोणताचबाणेदारपणा दाखवत नाहीत हीच समस्या महाराष्ट्राच्या मनात आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
गुरुवारी सकाळी सीमा भागातील लोकांशी संपर्क साधल्यानंतर शरद पवार यांनी तिथे शांतता असल्याची माहिती दिली. त्यानंतर संध्याकाळी काही घटनाघडल्या. त्याचा स्वतंत्रपणे विचार होईलच परंतु शरद पवार स्वतः तिकडे येतो बोलल्यानंतर कर्नाटकच्या भाषेत नरमाई आलेली आहे. त्यांनाही लक्षात आले आहे काय होऊ शकते त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी जनता सीमा भागात आहे. त्या जनतेला त्रास दिला तर महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा आहे हा एक मोठा संदेश शरद पवारांनी दिलेला आहे आणि त्यामुळे आता जास्त अनुचित प्रकार करण्याचे धाडस त्यांचे होणार नाही, असेही जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले.
सीमा प्रश्नात महाराष्ट्रातील मराठी लोकांना तिथे त्रास होतो आहे, हल्ले होत आहेत त्याबद्दल आवाज उठवायला लोकसभेत संधी दिली जात नाही. केंद्र सरकारने एवढे एकाबाजूने काम करणे योग्य नाही, असेही जयंत पाटील पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले.
सीमा भागातील वादाबाबत खासदारांना बोलू देण्यात आले नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाबाबत बोलत असताना खासदार अमोल कोल्हे यांचा माईक बंद करण्याचे पाप करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी दिल्लीला त्रास व्हायला लागला आहे. भाजपाच्या सभापतींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना थांबवले ही गंभीर व निषेध करणारी बाब आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
सध्या लोकभावनेचा उद्रेक झालेला आहे. लोकंसरकारच्या विरोधात गेली आहेत. सीमा प्रश्नावरुन राज्यातील काही गावातील लोकं कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या राज्यात जातो बोलत आहेत. असा प्रकार महाराष्ट्रात कधीच झाला नाही. एकनाथ शिंदेचे सरकार महाराष्ट्राला एकसंघ ठेवण्यातही अपयशी ठरले आहे. त्या भागातील जनतेला या सरकारबद्दल अविश्वास वाटायला लागला आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या मोर्चाला फार मोठा प्रतिसाद मिळणार आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.