चेन्नेकुपी येथील ट्रॅक्टरचालक हल्ल्यातील २ आरोपींना अटक

KolhapurLive
उत्तूर : बेलेवाडी घाटात १८ नोव्हेंबरला रात्री ट्रॅक्टर चालक आकाश बाबुराव पाटील (वय २३, रा. चेंनेकुप्पी, ता. गडहिंग्लज)याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.
तुकाराम उर्फ साईराज पांडुरंग पाटील (रा. हेलेवाडी ता. गडहिंग्लज), सुनील पाटील(रा.चेंनेकुप्पी), मारुती दिंडलखोप (रा.मरणहोळ, बेळगाव)उमाजी नाईक(रा. जरळी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.यापैकी साईराज व उमाजी यांना आज अटक करण्यात आली. यामध्ये वापरलेली तलवार व लोखंडी गज ही शस्त्रे पोलिसांनी जप्त केली.
याबाबत अधिक माहिती अशी आकाश पाटील १८ नोव्हेंबरला रात्री चेंनेकुप्पी येथून ऊस ट्रॅक्टर मध्ये भरून साखर कारखान्याकडे चालला होता. यावेळी घाटात दबा धरून बसलेल्या व तोंडाला रुमाल बांधल्यातील हल्लेखोरांनी आकाशचा पाठलाग सुरू केला. घाटातील वृंदावन फार्महाऊस जवळ त्याची ट्रॅक्टर थांबवत त्याच्यावर दहा वार केले. या घटनेनंतर आकाशला त्याच्या सहकाऱ्यांनी उपचारासाठी गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
पोलीस उपनिरीक्षक वाय. एस. जाधव व सहाय्यक फौजदार बी. एस.कोचारगी यांनी या घटनेचा तपास केला. यासाठी सायबर पोलिसांची मदत घेण्यात आली. दरम्यान आकाशला जिवे मारण्यासाठी हा हल्ला सुपारी देऊन झाला होता. हल्ल्यानंतर सुपारी देणारा फरार झाला त्याचा शोध पोलीस घेत आहेत. यासाठी पोलिसांचे पथक तपासासाठी परराज्यात जाणार आहे.