चंदगड : हलकर्णी (ता.चंदगड)येथील दौलत साखर कारखान्याकडून झालेल्या नुकसान भरपाई पोटी गडहिंग्लज दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी ता.३ कारखान्याची मशिनरी जप्तीसाठी गेलेल्या चंदगड न्यायालयाचे बेलीफ प्रशांत वाडकर व तक्रारदार सुशीला डीसले यांना अथर्व कंपनीच्या प्रशासनाने रोखले. हा कारखाना कंपनीने चालवायला घेतला असून कारवाई करता येणार नाही,अशी भूमिका अथर्व प्रशासनाने घेतली. याबाबत पुढील कारवाई करणार असल्याचे डीसले यांचे वकील अडव्होकट ए. एम. मकानदार यांनी सांगितले.
डीसले यांचा ट्रक २००७ साली कारखान्याकडे ऊस वाहतुकीसाठी होता. काही कारणाने डीसले यांचा ट्रक वाहतुकीसाठी थांबवण्यात आला. दरम्यानच्या काळात या ट्रक मधून सुमारे ६०० टन ऊस वाहतूक झाली होती. त्यामुळे त्यांनी गडहिंग्लज दिवाणी न्यायालयात दावा केला त्याचा निकाल लागून न्यायालयाने डीसले यांच्या ६ लाख ५६ हजार रुपये भरपाईसाठी कारखान्याचे मोलासिस, रोलर, ऊस तोडणी यंत्र आधी मशनरी जप्त करण्याचे आदेश दिले. वाडकर व डीसले हे आदेश लागू करण्यासाठी गेले असता हा कारखाना कंपनीने ३९ वर्षाच्या कराराने चालवायला घेतला आहे.त्यामुळे ही कारवाई करता येणार नाही, अशी भूमिका घेतली.