कर्नाटकातील बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या ट्रकवर ‘कन्नड रक्षण वेदिका संघटने’च्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीत महाराष्ट्राच्या काही ट्रकचे नुकसान झालं आहे. यानंतर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या घटनेवरून निषेध नोंदवत कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.
“राज्य-कर्नाटक सीमेच्या बाबतीत झालं, ते अत्यंत निषेधार्थ आहे. गेल्या काही आठवड्यांपासून हे प्रकरण सुरु आहे. सीमा भागाशी मी अनेक वर्षे संबंधित आहे. मला स्वत:ला लाठीहल्ल्याला तोंड द्यावे लागले,” असं शरद पवार यांनी सांगितलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन परिस्थिती निवाळावी, यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते. पुढील २४ तासात परिस्थिती निवळली पाहिजे. अन्यथा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यासाठी जबाबदार रहातील. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून चिथावणीखोर भूमिका जर घडत असेल, तर देशाच्या स्थैर्याला मोठा धक्का असेल. केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. उद्यापासून संसदीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्यातील खासदारांना सांगणार आहे, की संसदेत भूमिका मांडा. कोणी कायदा हातात घेतला, तर त्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारला घ्यावी लागेल,” असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.
माझ्याकडे जी माहिती आली आहे ती अत्यंत चिंताजनक आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं की, बेळगावमधील स्थिती गंभीर असून, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनाची चौकशी केली जात आहे. निवेदन देण्यासाठी मज्जाव केला जात आहे,” असेही शरद पवार यांनी सांगितलं.
.