सोलापूरमध्ये ‘कर्नाटक भवन’ बांधणार असल्याचे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले होते. बोम्मई यांच्या विधानावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला लक्ष केले. ”सीमावादाच्या मुद्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक होत असेल, तर आमचे मुख्यमंत्री गुवाहाटीवरून आल्यानंतर शांत का? बेळगावच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत? बेळगाव महाराष्ट्रात यावं यासाठी नवस का केला जात नाही? अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. आज सेवालाल महाराजांचे वंशज अनिल राठोड यांच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला,यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“साधारणता प्रत्येक राज्यात इतर राज्यांच्या भवन असतात. मात्र, आपलं आणि कर्नाटकचं नातं काय आहे, हे अजून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून ऐकायला आलेलं नाही. महाराष्ट्रात ते ‘कर्नाटक भवन’ बांधत असतील, तर आजच मी वृत्तपत्रात वाचले की, महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकात येण्यास मज्जाव केला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एक शब्दही बोलले नाही”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.
“सीमावादाच्या मुद्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक होत असेल तर आमचे मुख्यमंत्री गुवाहाटीवरून आलेल्यानंतर शांत का? बेळगावच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत? बेळगाव महाराष्ट्रात यावं यासाठी नवस का केला जात नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. आता कर्नाटकने आपल्या तलावांमध्ये पाणी सोडलं आहे आणि आपले सत्ताधारी सत्तेच्या पाण्याखाली गटांगळ्या खात आहेत. या नेभळटपणाविरुद्ध आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे”, असेही ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी उदयनराजेंच्या राज्यपालांविरोधीत भूमिकेसंदर्भातही प्रतिक्रिया दिली.“उदयनराजेचं धन्यवाद मानतो. गेल्यावेळी सांगितलं होतं की, भाजपातील छत्रपती प्रेमी एकत्र यावेत. त्याबाबत सुरुवात झाली आहे. तसेच, महाराष्ट्रातील गद्दारीची तुलना छत्रपतींच्या आग्र्यातील सुटकेशी केली जाते. अजूनही ते मंत्री राहत असतील तर महाराष्ट्र काय आहे, हे दाखवण्याची वेळ आली आहे,” असे ते म्हणाले.