राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि मंगलप्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर आता भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनीही शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले आहे. दरम्यान, लाड यांच्या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज रत्नागिरीत असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रसाद लाड यांच्या विधानाबाबात विचारले असता, “शिवाजी महाराजांकडून काही घेऊ नका. जे महाराजांनी सांगितलं, जे महाराजांनी शिकवलं, त्या गोष्टी शिकायचं नाही. फक्त नको ते वाद करत बसायचे. एवढच सध्या सुरू आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. बेरोजगारी, शिक्षण आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष विचलीत करण्यासाठी नको ते विषय काढले जातात, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना, “यंदा कोकण दौऱ्यात मला लोकांच्या देहबोलीमध्ये खूप फरक जाणवतो आहे. येत्या जानेवारीमध्ये कोकणात माझ्या दोन सभा आहेत. त्यापैकी एक कुडाळ आणि दुसरी रत्नागिरी किंवा चिपळून येथे होईल”, अशी माहिती त्यांनी दिली.