आठवडी बाजारात गडहिंग्लजला १ लाख ५१ हजारात मुऱ्हा म्हशीची खरेदी

KolhapurLive
गडहिंग्लज : गडहिंग्लजला मार्केट यार्डात तब्बल तीन महिन्यांनी जनावरांचा बाजार भरलेला दिसून आला. बाजारात गडहिंग्लजचे साहिल काझी यांची मुऱ्हा जातीची म्हैस १ लाख ५१ हजार रुपयाला संदीप पाटील या शेतकऱ्याने खरेदी केली आहे. या व्यवहारानंतर म्हशीवर गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. आजच्या दिवसातील म्हशीला सर्वात अधिक दर मिळाल्याचे व्यापाऱ्याकडून सांगण्यात आले. बाजारात मुऱ्हा,जाफराबादी,पंढरपुरी म्हैसाना आधी जातीच्या म्हशीची आवक झाली होती. पुन्हा बाजार भरल्याने मार्केट यार्डच्या परिसरातील हॉटेलधारक, पशुपालक, शेतकरी व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाच्या वातावरण दिसून आले. लम्पी या संसर्गजन्य आजाराची साथ वाढल्याने खबरदारीसाठी जनावरांचा बाजार बंद ठेवण्यात आला होता.आता या संसर्गाची तीव्रता कमी झाल्याचे समोर आल्याने प्रशासनाने अटी शर्तीवर बाजार भरवण्यास परवानगी दिली आहे.