गडहिंग्लज अर्बन को-ऑप बँकेची निवडणूक २० डिसेंबर पर्यंत स्थगित

KolhapurLive

गडहिंग्लज
: गडहिंग्लज अर्बन को-ऑप बँकेच्या १७ जागेसाठी निवडणूक होत असून आज अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर ६२ उमेदवारांनी ७५ अर्ज दाखल केले आहेत. असे असले तरी शासनाने सायंकाळी काढलेल्या परिपत्रकात सहकारी संस्थेतील 'अ' आणि 'ब' या वर्गातील संस्थांच्या निवडणुका २० डिसेंबर पर्यंत स्थगित केल्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे गडहिंग्लज अर्बन बँकेची निवडणूक २० डिसेंबर पर्यंत स्थगित करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमित गराडे यांनी दिली.
      गडहिंग्लज अर्बन बँक आर्थिक घोटाळ्यानंतर चर्चेत आली आहे.बँक सावरण्यासाठी विविध संस्था, व्यक्तींनी मदत केली.याच अवस्थेत निवडणूक जाहीर झाल्यानंतर साऱ्यांचे लक्ष निवडणुकीकडे लागले होते. बँकेचे विद्यमान चेअरमन दत्तात्रय बरगे यांच्यासह एकूण ५४ उमेदवारी अर्ज खुल्या प्रवर्गातून दाखल झाले. मुख्यालयाबाहेर २५ किमी शाखा प्रतिनिधीच्या जागेसाठी ९ अर्ज ,अनुसूचित जाती जमाती गटातून ४, इतर मागास गटातून २ अर्ज, विमुक्त जाती गटातून ४ अर्ज, महिला राखीव गटातून ९ अर्ज दाखल झाले आहेत. बहुतांशी विद्यमान संचालकांनी निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. याचा अर्जाची छाननी बुधवारी होणार होती. पण ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अ आणि ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलले आहेत. या निवडणुका २० डिसेंबर पर्यंत स्थगित केल्या असून त्यानंतर याबाबतचा निर्णय होऊन पुढील कार्यवाही होणार असल्याचे सांगण्यात आले.