राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक विधान केल्याने त्यांना राज्यपालपदावरून हटवावे, अशी मागणी राज्यात विरोधी पक्ष व विविध संघटनांकडून केली जात आहे. याबाबत विचारणा केली असता राज ठाकरे यांनी काही व्यक्तींना पदे मिळाली तरी त्याची पोच येत नाही.
कोठे काय बोलावे हेच त्यांना समजत नाही, अशा शब्दांत कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढले. अशांना कोणी स्क्रिप्ट लिहून देते का? विषारी विधाने करण्याने विषवल्ली पसरत आहे, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोंम्मई यांनी सीमाप्रश्नी वादग्रस्त विधान केले आहे. याकडे लक्ष वेधले असता राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाही त्याबाबत आत्ताच वादग्रस्त विधान करण्याची प्रवृत्ती कुठून येते?, अशी बोंम्मई यांच्यावर टीका करून महत्त्वाचे प्रश्न ऐरणीवर येऊ नये यासाठी असे वादाचे प्रश्न उपस्थित केले जातात असेही ते म्हणाले.