राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. मुंबईत पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना राज ठाकरेंनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. तसंच स्वबळावर निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टीव्ही ९ शी बोलताना दिली आहे. दरम्यान बाळा नांदगावकर यांनी मात्र अद्याप यावर चर्चा सुरु असल्याचं सांगितलं आहे.
संदीप देशपांडे यांनी सांगितलं की “राज ठाकरेंनी बैठकीत महानगरपालिका निवडणुकांना कसं सामोरे जायचं यासंदर्भातील मार्गदर्शन केलं. सर्व महापालिकांच्या सर्व जागा लढवण्याचे निर्देश राज ठाकरेंनी दिले आहेत. त्या कशा लढवायच्या यासंदर्भातील मार्गर्शन राज ठाकरेंनी केलं”. राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला का? असं विचारण्यात आलं असता सगळ्या महापालिकांमधील सगळ्या जागा म्हणजे अर्थ तोच झाला असं सांगत त्यांनी दुजोरा दिला.
तुमची विचारसरणी सकारात्मक असणं गरजेचं आहे असंही राज यांनी तेच सांगितलं. “आम्हाला सहानुभूती मिळत असल्याचा, आम्ही रडलो तर लोकांच्या डोळ्यात पाणी येईल असा खोटा प्रचार सुरु आहे. त्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. अशी कोणतीही सहानुभूतीची लाट नाही,” असं राज ठाकरेंनी सांगितलं असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.
विचार सकारात्मक ठेवा, तुम्हाला सत्तेत नेण्याचं काम मी करेन. सत्तेत नेण्याचं काम म्हणजे तुम्हालाच सत्तेत बसवेन. तुम्हाला सांगून मी खुर्चीत बसणार नाही हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं,” अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.