१९८५च्या निवडणुकीत छगन भुजबळांनी ‘मशाल’ चिन्ह का निवडलं? त्यांनीच सांगितलं कारण, म्हणाले…

KolhapurLive

१९८५च्या निवडणुकीत छगन भुजबळांनी ‘मशाल’ चिन्ह का निवडलं? त्यांनीच सांगितलं कारण, म्हणाले…
संग्रहित
केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्याबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर सोमवारी दोन्ही गटाला नवे नाव आणि चिन्ह वाटप करण्यात आले. उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ असे नाव मिळाले असून शिंदे गटाला शिवसेना ( बाळासाहेब ठाकरे ) असे नाव देण्यात आले आहे. तर उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेकडून ‘मशाल’ या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी १९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन आमदार छगन भुजबळ यांनीही ‘मशाल’ या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी ‘मशाल’ हे चिन्ह का निवडले याचे कारण त्यांनी सांगितले.

आम्ही मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढत होतो. निवडणूक लढवावी, अस आमच्या मनातही नव्हतं. जसा जसा काळ पुढे गेला. आम्ही निवडणुका लढायला लागलो. तेव्हा शिवसेना हा पक्ष नोंदणीकृत पक्ष नव्हता. त्यामुळे आमच्याकडे चिन्हही नव्हते. इंदिरा गांधींच्या हत्यनंतर दोन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी बाळासाहेबांनी अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले. मात्र, आमच्याकडे चिन्ह नव्हते. आमचे उमेदवार चेंडू-फळी वगैरे अशी चिन्हे घेत होते. त्यावेळी मी ‘मशाल’ हे चिन्ह घेतले. त्याचे कारण म्हणजे, त्यावेळी आम्ही प्रचाराचा भाग म्हणून भींतींवर चिन्ह रेखाटत होतो. खरं तर वाघ आम्ही आमचं चिन्ह समजत होतो. मात्र वाघ काढायला कठिण होता. त्यामुळे मी ‘मशाल’ चिन्ह घेतले होते. निकालानंतर मी आमदार म्हणून निवडणून आलो होतो”, अशी आठवण छगन भुजबळ यांनी सांगितली.
मुंबई महानगरपालिकेत आमचा छोटा ग्रुप होता. मी निवडून आल्यानंतर सर्वांनीच पुढच्या निवडणुकीत ‘मशाल’ हे चिन्ह घेतले. त्यावेळी आमचे ७०च्यावर नगरसेवक निवडणूक होते. त्यानंतर बाळासाहेबांनी मलाच महापौर केले होते. एकाच वेळी आमदार आणि महापौर असणारा मी एकमेव लोकप्रतिनिधी होतो”, असेही ते म्हणाले.
दरम्यान, यावेळीसुद्धा मशालीने इतिहास घडेल का असे विचारले असता, ते म्हणाले, “या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक उद्धव ठाकरेंना जड जाणार नाही, त्यांची जागा सहज जिंकून येईल.”