अभिनेत्री कतरिना कैफच्या ‘फोन भूत’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या चित्रपटात कतरिनाबरोबर ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हॉरर-कॉमेडी असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक केलं जातंय. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने त्याची पत्नी कतरिना कैफच्या आगामी चित्रपट फोन भूतच्या ट्रेलरवर प्रतिक्रिया दिली आहे
इन्स्टाग्रामवर चित्रपटाचा ट्रेलर पुन्हा शेअर करत विकीने लिहिलं, “माझी क्यूट-नी बनलीये भूत-नी.” त्याने याबरोबरच काही हार्ट इमोजी देखील जोडले. याशिवाय कतरिनाचे चांगले मित्र आणि चित्रपट निर्माते अली अब्बास जफर यांनीही ट्रेलरवर प्रतिक्रिया देत मिश्कील टिप्पणी करत “शेवटी तू स्वतःचंच पात्र करतीयेस” असं म्हटलं.
यापूर्वी, कतरिनाने विकीला फोन भूतचा ट्रेलर मजेदार वाटल्याचं सांगितलं होतं. ट्रेलर लॉन्च कार्यक्रमादरम्यान ती म्हणाली, “विक्कीला ट्रेलर खूप आवडला. त्याने खूप चांगली प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे आम्हाला आणखी आत्मविश्वास मिळाला आणि आनंद झालाय. त्याला वाटतंय की हा चित्रपट मजेदार आहे आणि लोक त्याच्याशी कनेक्ट होतील.”