‘बिग बॉस ४’ मराठीच्या स्पर्धकांना सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी सुनावलं आहे. त्यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत राग व्यक्त केला.
‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाच्यापहिल्याआठवड्यापासूनच स्पर्धकांमध्ये भांडण, राडे होण्यास सुरुवात झाली. शोचे सुत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी यावरून स्पर्धकांची शाळाही घेतली. या घरामध्ये होणारं भांडण आणि स्पर्धकांचा राग एका वेगळ्याच थराला पोहोचतो हे प्रेक्षकांनी याआधीही पाहिलं आहे. असंच काहीसं अपूर्वा नेमळेकरच्या बाबतीतही घडताना दिसत आहे. पण सध्या घरात जी परिस्थिती निर्माण झाली आहे याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी इन्स्टाग्रामद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे.
‘बिग बॉस’ मराठीच्या तिसऱ्या पर्वामध्ये सुरेखा कुडची स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. प्रेक्षकांनीही त्यांना अधिक पसंती दर्शवली होती. आताही ‘बिग बॉस’चं नवं सीझन त्या आवडीने पाहतात. म्हणूनच की काय स्पर्धकांचं आताचं वागणं त्यांना अजिबात पटलेलं नाही. शोमध्ये सहभागी झालेल्या ज्येष्ठ कलाकारांना मान दिला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे.
काय म्हणाल्या सुरेखा कुडची?
“आज ‘बिग बॉस’ मराठीचा एपिसोड पाहिला. नवोदित कलाकार एखाद्या ज्येष्ठ कलाकाराला अरे तुरे करून बोलतो हे ऐकून वाईट वाटलं. निदान वयाचा तरी मान ठेवून बोलावं.” असं सुरेखा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे म्हटलं आहे. त्यांची ही पोस्ट पाहता स्पर्धक अपूर्वा नेमळेकरला त्यांनी सुनावलं असल्याचं दिसून येत आहे.