संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानने काश्मीरवरून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला.युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध मागील आठ महिन्यांच्या कालावधीपासून सुरु आहे. या युद्धाबाबत संयुक्त राष्ट्र सभेत चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याला भारताकडूनही सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर मिळालं आहे.
भारताने काश्मीर प्रश्नावरून चर्चा करत मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा, असं पाकिस्तानचे प्रतिनिधी मुनीर अक्रम यांनी म्हटलं. याला उत्तर देताना भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज म्हणाल्या की, “पाकिस्तानच्या फालतू आणि निरर्थक प्रश्नाने आम्ही आश्चर्यचकित झालो असून, ते या मंचाचा गैरवापर करत आहे. सतत खोटे बोलणाऱ्या पाकिस्तानचे हे विधान सामूहिक अवमानास पात्र ठरते.”
“जम्मू आणि काश्मीरचा प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता आणि असेल. पाकिस्तानला सीमेपलीकडे सुरु असलेल्या दहशतवादी कारवाया थांबवण्याचे आवाहन करतो. ज्यामुळे काश्मीरमधील नागरिक शांततेने नांदू शकतील,” असेही रुचिरा कंबोज यांनी सांगितलं.दरम्यान, रशियाने युक्रेनच्या चार प्रदेशांवर ताबा मिळवला आहे. याच्या निषेधार्थ संयुक्त राष्ट्र सभेत मतदान घेण्यात आले. यावेळी १४३ देशांनी विरोधात तर पाच जणांनी रशियाच्या बाजूने मतदान केलं. तर, भारतासह ३५ देशांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.