*“यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय”; लग्नाच्या रिसेप्शनमध्ये माधुरीचे पती डॉक्टर नेनेंनी जेव्हा बिग बींना पाहिलं"

KolhapurLive

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अनेक जुने किस्से व्हायरल होत आहेत. असाच एक किस्सा अभिनेत्री माधुरी दिक्षीतच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये घडला होता. माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांचा चित्रपटसृष्टीशी काहीच संबंध नाही, शिवाय ते परदेशात राहायचे, त्यामुळे बॉलिवूड कलाकारांविषयी त्यांना फार माहिती नव्हती. माधुरी आणि डॉ. नेने यांच्या रिसेप्शनला अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी डॉ. नेनेंनी बिग बींना पाहताच “यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय” अशी प्रतिक्रिया दिली होती.
     माधुरी त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचा किस्सा सांगत पुढे म्हणाली, “मला वाटतं की त्यांनी फक्त अमिताभ यांनाच रिसेप्शनमध्ये ओळखलं होतं. जेव्हा ते शाळेत होते तेव्हा त्यांनी अमिताभ यांचा चित्रपट पाहिला होता आणि तो चित्रपट ‘अमर अकबर एंथॉनी’ होता. डॉक्टर नेने म्हणाले, मला असं वाटतंय की मी त्यांना ओळखतो. तेव्हा मी त्यांना म्हणाली, तुम्ही त्यांना चित्रपटामुळे ओळखत असाल.”
     मात्र, डॉक्टर नेनेंनी इतर कोणत्याही कलाकाराला ओळखले नव्हते. याचे कारण म्हणजे त्यांनी कधीच हिंदी चित्रपट पाहिले नव्हते. लग्नाआधी माधूरी किती लोकप्रिय आहे याविषयी त्यांना माहित नव्हते. ते दोघे पहिल्यांदा माधुरीच्या भावाच्या घरी भेटले होते, नंतर त्यांनी १७ ऑक्टोबर १९९९ साली लग्न केले. त्यांना दोन मुलं आहेत. अरिन आणि रयान अशी त्यांच्या मुलांची नावं आहे