ISL Final: इंडियन सुपर लीगला मिळाला नवा विजेता, पेनाल्टी शूटआउटमध्ये हैदराबादचा थरारक विजय

KolhapurLive

 

Hyderabad FC vs Kerala Blasters: इंडियन सुपर लीगच्या फायनल सामन्यात हैदराबाद एफसीने केरला ब्लास्टर्सचा पराभवकरून पहिले विजेतेपद मिळवले. त्यांनी पेनाल्टी शूटआउटमध्ये विजय संपादन केला.




मडगाव: गोलकीपर लक्ष्मीकांत कट्टिमणीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर हैदराबाद एफसीने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात केरला ब्लास्टर्सचा पेनाल्टी शूटआउटमध्ये पराभव करून प्रथमच इंडियन सुपर लीगचे विजेतेपद मिळवले. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ गोल केला होता. अतिरिक्त वेळेत देखील दोघांना गोल करता आला नाही. त्यानंतर विजेतेपदाचा निकाल पेनल्टी शूटआऊटद्वारे ठरवला गेला.

पेनल्टीमध्ये हैदराबादने ३-१ने विजय मिळवला. हैदराबादकडून जोआओ विक्टर, खासा कमारा आणि हलीचरण नारजारी यांनी गोल केले. तर केरलाकडून फक्त आयुष अधिकारी गोल करू शकला. हैदराबादचा गोलकीपर कट्टिमणीने ३ गोल वाचवले. त्याआधी केपी राहुलने ६८व्या मिनिटाला गोल करून केरळला आघाडी मिळून दिली होती. पण साहिल तवोराने ८८व्या मिनिटाला गोल करून हैदराबादला बरोबरी मिळून दिली. दोन्ही संघांकडे पहिल्या हाफमध्ये गोल करण्याची संधी होती. पण त्यांना यश मिळाले नाही.

इंडियन सुपर लीगच्या अंतिम फेरीत पराभव होण्याची केरला संघाची ही तिसरी वेळ आहे. याआधी लीगच्या पहिल्या हंगामात २०१४मध्ये त्यांचा कोलकाताने १-० असा पराभव केला होता. त्यानतंर २०१६ साली पुन्हा एकदा कोलकाताकडूनच त्यांचा पराभव झाला. तेव्हा सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला होता. या लीगचे विजेतेपद मिळवणारा हैदराबाद हा पाचवा संघ ठरला आहे. आतापर्यंत झालेल्यया ८ हंगामात कोलकाताने सर्वाधिक ३, चेन्नईने २ मुंबई सिटी आणि बेंगळुरूने प्रत्येकी एक विजेतेपद मिळवले आहे.