देवाळे : जुलै आला, की शिवप्रेमी, निसर्गप्रेमी यांना वेध लागतात, ते पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचे. स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान केलेल्या नरवीर शिवा काशीद, नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेना यांची निष्ठा, त्याग व स्वामीनिष्ठेने भारावलेल्या ज्वलंत इतिहासाची साक्ष देण्याऱ्या या मार्गावरील पदभ्रमंती मोहिमेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, बेळगाव व गोव्यासह देशभरातील विविध राज्यांतून शिवप्रेमी येतात.
पावसाची कोणतीही तमा न बाळगता ‘जय भवानी...जय शिवाजी... छत्रपती शिवाजी महाराज की जय...छत्रपती संभाजी महाराज की जय...हर हर महादेव...’ हा जयघोष करीत शिवप्रेमी शिवरायांच्या इतिहासाची पाने जागृत करीत ही खडतर वाट तुडवतात.
१२ जुलै १६६० रोजी रात्री याच दाट धुक्याचा व मुसळधार पावसाचा फायदा घेऊन सह्याद्रीच्या डोगररांगा, कड्या-कपारींची ढाल करून छत्रपती शिवाजी महाराज गनिमी काव्याने पन्हाळगडाभोवती कडेकोट पहारा असणाऱ्या सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटून मोजक्या बांदल मावळ्यांसह विशाळगडावर पोहोचले होते. याचाच प्रत्यक्ष साडेतीनशे वर्षांपूर्वीचा ज्वलंत व थरारक इतिहास हे गिर्यारोहक या पदभ्रमंती मोहिमेतून अनुभवतात.
या मोहीम मार्गाच्या वाड्या वस्त्यांवरील मुलांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे म्हणून मोहिमेला जाणारे शिवप्रेमी येथील मुलांना वह्या, पुस्तके, पेन, पेन्सील, पाऊच, स्कूलबॅगसह विविध शालेपयोगी साहित्याबरोबरच खाऊचे वाटप करून कोणत्याही प्रसिद्धीशिवाय सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करत आहेत. शिवविचारातून प्रेरणा घेऊन पदभ्रमंतीसाठी येणाऱ्या गिर्यारोहकाकडू दिल्या जाणाऱ्या शालेय साहित्यातून या दुर्गम वाड्या-वस्त्यावर शिक्षण घेणाऱ्या मुलांना नक्की बळ मिळेल.
- जयवंत खेतल, शिक्षक-तुरुकवाडी