कोल्हापूर : तृणभक्षक वन्यजीवांना कोळशींदचे भय

KolhapurLive


 कोल्हापूर - मोकट कुत्र्यांकडून नागरी वस्तीत होणाऱ्या हल्ल्यामुळे सर्वत्र भीती आहे. अशाच प्रकारे जिल्ह्यातील आजरा, चंदगड, भुदरगड भागांतील जंगली भागात कोळशींद म्हणजे जंगली श्वानाची भीती ठळक आहे. कोळशींद हा कमालीचा हिंस्त्र तितकाच विक्षिप्त असल्याने लहान वन्यजीवांना अक्षरक्षः पळवून पळवून मारण्याची त्याची शिकारीची क्रूर पद्धत जंगली भागात दहशत माजवत आहे.

निसर्गातील अन्न साखळीचा भाग असल्याने कोळशींदची दहशत नैसर्गिक मानली जाते. अशा स्थितीत हरण, भेकर, सांबर, तृणभक्षक वन्यजीव नियमित ठिकाणातून स्थलांतरित होत आहेत. याशिवाय जंगल हद्दीशेजारील भागात बकरी, शेळ्यांवर कोळशींदचे हल्ले होऊ शकत असल्याने खबरदारी घेण्याची गरज आहे, असे निरीक्षण वन विभागाच्या गस्ती पथकाने नोंदविले आहे.

जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळ्यापासून गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगडपर्यंतचा पट्टा घनदाट जंगली आहे. येथे पट्टेरी वाघ, गवे, बिबट्या, अस्वल, हत्ती यांसारख्या वन्यजीवांचा वावर आढळला आहे. गव्यांची संख्या काही हजारात आहे. अशा विपुल जंगल क्षेत्रात कोळशींदचे पूर्वीपासून वास्तव्य आहे. त्यांची संख्या अलीकडच्या काळात वाढली आहे. पूर्वी ठराविक जंगल पट्ट्यात अवघ्या दोन-पाच किलोमीटरमध्ये कोळशींदचा कळप दिसत होता. आता जंगलातील वीस किलोमीटर क्षेत्रापर्यंत त्याचा वावर वाढला आहे.

कोळशींद नागरी भागात भटकणाऱ्या मोकाट कुत्र्याप्रमाणेच आहे; मात्र त्याची शेपूट झुप्पेदार असते. तोंड काळे, डोळे तांबूस, अंगकांती गडद तपकिरी व नजर करारी असते. शक्यतो पाचपेक्षा अधिक संख्येचा कळप जंगलात भटकतो. हरिण, सांबरांवर हा कळप हल्ला करतो. वर्षभरात कोळशींदचे कळप वाढले तसे हरण व सांबरांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले. पावसाळ्यातही थोड्याफार फरकाने असेच प्रकार घडले. त्यापाठोपाठ ज्या भागात हरण, भेकर, सांबर दिसत होते त्या भागातून त्यांचे स्थलांतर झाले आहे, असेही जंगल गस्तीत दिसले आहे.

‘जनावरे मालकांनी खबरदारी घ्यावी’

कोळशींदचा वावर जंगली पट्ट्यात आहे. कोळशींद आक्रमक व हिंस्त्र जनावर आहे. काही वेळा जंगलालगतच्या गायरान जमीन किंवा मालीक जमीन क्षेत्रात पाळीव प्राणी चरण्यासाठी सोडले जातात. अशी जनावरे यातही रेडकू, बकरी, शेळ्या-मेंढ्यांवर कोळशींद हल्ला करतो. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

कोळशींदच्या कळपाने एखादे हरिण किंवा सांबर (भक्ष्य) बघितले की, ते त्यावर नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला करतात. एक कोळशींद शिळ घातल्याप्रमाणे आवाज काढतो. उर्वरित दोन-तीन कोळशींद त्या भक्ष्याचा टप्प्याने टप्प्याने पाठलाग करतात. एका ठराविक अंतरावर थांबतात. तिथून पुढे आणखी एक-दोन कोळशींद भक्ष्याचा पुढे पाठलाग करतात. पुढचे भक्ष्य पळून दमले की, सगळे मिळून त्या भक्ष्याच्या डोळ्यांवर हल्ला करतात, लचके तोडतात. क्रूरतेने भक्ष्याला मारतात इतकी हिंस्त्रता कोळशींदमध्ये आहे.

-दत्ता पाटील, वनपाल