कोल्हापुरातील रेस्टॉरंटमध्ये रोबोटची एन्ट्री

KolhapurLive

 



कोल्हापूर : रेस्टॉरंटमध्ये तुमच्यासमोर वेटर नव्हे तर चक्क रोबोट इडलीची डिश घेऊन उभा राहिला तर? तुम्ही त्यांच्याकडील इडलीची प्लेट उचलून घ्यायची आणि त्याच्या कंबरेच्या बाजूला असलेले ‘एक्झिट’ बटन दाबायचे. तो ‘थॅक्यू’ म्हणून किचनमध्ये निघून जाईल. ही संकल्पना आता कोल्हापुरात सुरू झाली आहे. यानिमित्ताने कोल्हापुरातील रेस्टॉरंटमध्ये रोबोटने ‘एन्ट्री’ केली आहे.

हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये कामगारांची कमतरता भासत आहे. यावर उपाय म्हणून थेट रोबोटच वेटरचे काम करू लागला, तर अशी कल्पना शिवाजी उद्यमगनरातील महेश बुधले यांना सुचली. अनेक हलत्या देखाव्यात बुधले यांचे कौशल्यपणाला लागते. त्यांनीच हॉटेलमध्ये रोबोट आणण्याची कल्पना उद्यमनगरातील ‘इडली स्क्वेअर’ या रेस्टॉरंटमध्ये आणली.

दोन दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या या रेस्टॉरंटमध्ये सर्वकाही चौकोनी आहे. येथे दोन रोबोट आहेत. टेबल क्रमांकाची कमांड देऊन किचनमधून पाठविले तर ज्या टेबलवर ऑर्डर द्यायची आहे. त्याच ठिकाणी जाऊन थांबतो. तेथे ग्राहकाने त्याच्याकडील नाश्‍त्याची प्लेट उचलून घ्यायची आणि ‘एक्झिट’ बटन दाबायचे. त्यानंतर वळून रोबोट किचनमध्ये जातो. हे पाहण्यासाठीही आता या रेस्टॉरंटमध्ये गर्दी होत आहे.

रेस्टॉरंटमधील रोबोट लहान मुलांचे आकर्षण बनले आहे. येथे लहान मुलांसाठी स्पेशल फ्लेवरच्या रंगीत इडल्याही आहेत. जेव्हा रोबोट मुलांच्या टेबलसमोर जातो तेव्हा ते कुतुहलाने न्याहळतात. चक्क टेबलवर बसून रोबोटच्या हातातील प्लेट उत्सुकतेने घेतात. रोबोटला जमिनीतून सेन्सर दिले आहेत. भविष्यातील एक पर्याय म्हणून याकडे पाहिले जात आहे.

तैवाण, अमेरिका अशा देशांत रोबोटचा वापर रेस्टॉरंटमध्ये होतो. त्याचाच एक प्रयत्न महेश बुधले यांच्या माध्यमातून केला आहे. कोल्हापुरात एक नवी सुरुवात करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात नागपूरमध्ये आणि राज्याबाहेर मेट्रोसिटीमध्ये याचा वापर होतो.

- राज कामत, रेस्टॉरंटचालक