मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या्ंना कोल्हापूर बंदचा इशारा देण्यात आला आहे. शिवसेनेने हा इशारा दिला आहे. शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला १० कोटींचा निधी देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला १५ ऑगस्टपूर्वी दहा कोटीचा मंजूर झालेला निधी न दिल्यास मुख्यमंत्र्यांना कोल्हापूर प्रवेश बंद आणि कोल्हापूर बंद करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. दरम्यान, मंजूर निधीला राज्य सरकारने स्थगिती दिल्याचा निषेध करत जनतेत झोळी पसरून निधी जमा करण्याचे प्रतिकात्मक आंदोलन करत शिवसेनेने आगळे वेगळे आंदोलन केले.
कोल्हापुरातील नर्सरी बाग येथे रा. शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील कामाला महापालिकेने निधी दिला. यामुळे समाधी स्थळाचे काम पूर्ण झाले. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते दोन वर्षापूर्वी त्याचे उद्घाटनही झाले. पण अजूनही तिथे सुशोभिकरणासह इतर काही कामे शिल्लक आहेत. यासाठी महाविकास आघाडी सरकारने दहा कोटी चाळीस लाखाचा निधी मंजूर केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेवर येताच महाविकास आघाडी सरकारचे अनेक निर्णय स्थगित केले. काही निधींना दिलेली मंजूरी थांबविली. त्यामध्ये शाहू महाराजांच्या समाधी स्थळाला मंजूर केलेल्या निधीचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर हा निधी तातडीने मिळावा, त्याला दिलेली स्थगिती उठवावी या मागणीसाठी शिवसेनेा आक्रमक झाली आहे. शुक्रवारी पक्षाच्या वतीने प्रतिकात्म आंदोलन करण्यात आले. शहरातील महाव्दार रोड, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी चौक, महापालिका परिसरात झोळी पसरून जनतेकडून निधी जमा करण्यात आला. हा निधी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
हा निधी मुख्यमंत्री शिंदे यांनी १५ ऑगस्टपूर्वी दयावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तो न दिल्यास कोल्हापूर बंदची हाक देण्यात येईल, शिवाय मुख्यमंत्र्यांना कोल्हापूर प्रवेश बंद करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, शहर संघटक हर्षल सुर्वे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.