पुण्यातील झोपडपट्टीत बालपण, अभिनयासाठी मुंबई गाठली; प्रसिद्ध वेबसीरिजमध्ये मिळवलं काम

KolhapurLive

 

BE.Rojgar Fame Sambhaji Sasane News: 'बेरोजगार' या वेब सीरिजच्या निमित्तानं पापड्या म्हणजेच अभिनेता संभाजी ससाणे

 अनेकांपर्यंत पोहोचला. त्याची संवादफेक, अभिनय आणि सादरीकरण यामुळे त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.





रामेश्वर जगदाळे, मटा प्रतिनिधी

मुंबई: एक झोपट्टीमध्ये राहणारा मुलगा स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतो, नाव मोठं करतो आणि मग त्याला यश मिळतं. अशा कथा आपण सिनेमा आणि इतर माध्यमांमधून नेहमीच बघत असतो. पण खऱ्या आयुष्यातही काहींच्या बाबतीत ही गोष्ट घडत असते. अभिनेता संभाजी ससाणेच्या बाबतीत असंच काहीसं घडलं.

पुण्याच्या स्वारगेटजवळील हिराबाग झोपडपट्टीमध्ये वाढलेल्या संभाजीला वेगवेगळ्या प्रांतांमधून आलेली माणसं, त्यांच्या भाषा, त्यांचं राहणीमान याविषयी कुतूहल वाटे. त्याच्या अभिनयप्रवासाबद्दल तो म्हणाला, 'गणेशोत्सवात सादर होणारी पथनाट्य, नाटक हा माझ्या आवडीचा विषय होता. गणेशोत्सवाची मी आतुरतेनं वाट पाहायचो. कमल हसनच्या 'सदमा' चित्रपटाचा माझ्यावर प्रभाव पडला. माझ्या आजोबांमुळे घरात आधीपासून तमिळ आणि हिंदी भाषेचा पगडा होता. त्यामुळे कमल हसन, शिवाजी गणेशन आणि अशोक सराफ या दिग्गज कलाकारांच्या कलाकृती माझ्यापर्यंत पोहोचल्या. दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीबद्दल माझ्या मनात ओढ निर्माण झाली आणि त्यानंतर मी यात करिअर करायचं ठरवलं.'

'वाघेऱ्या' या चित्रपटापासून सुरू झालेला संभाजीचा प्रवास आता 'बेरोजगार' या वेब सीरिजपर्यंत येऊन पोहोचला आहे. 'पुण्यात असताना मी अनेक नाटकांच्या ग्रुपमध्ये पडद्यामागे काम केलं. चांगलं काहीतरी करावं यासाठी मुंबईमध्ये आलो. नाटकाचं प्रशिक्षण घेण्यासाठी एका संस्थेत ऑडिशन दिली. पण तिथे प्रवेश घेण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यावेळी मुंबई साहित्य संघाचे प्रमुख दिवंगत डॉ. राजाराम भालेराव यांनी शिष्यवृत्ती देऊ केली म्हणून मला तिकडे शिकता आलं. अभिषेक मुजुमदारबरोबर काम करण्याची माझी इच्छा होती. म्हणून त्याच्या 'मुक्तिधाम' या हिंदी नाटकामध्ये मी काम केलं. त्यावरून पुढे हिंदी माध्यमात अनेक कामं मिळत गेली', असं संभाजीनं सांगितलं.