अतिवृष्टीने १५ लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली

KolhapurLive

 



सोलापूर - राज्यातील नांदेड, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, नागपूरसह एकूण २६ जिल्ह्यांतील १४ लाख १८ हजार ३०३ हेक्टरवरील खरीप पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडे प्राप्त झाला आहे. तर ऑगस्टमध्ये अतिवृष्टीने ८१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

राज्यात खरीप पिकांखाली १५० लाख हेक्टर क्षेत्र आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये बहुतेक जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली आहे. २४ तासांत ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्यानंतर अतिवृष्टी समजली जाते. त्यानुसार राज्यातील सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, नगर, सोलापूर व ठाणे जिल्हे वगळता उर्वरित बहुतेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील दोन हजार हेक्टर, नगर जिल्ह्यात ४३३ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे.

जिल्हानिहाय पंचनाम्याचे अहवाल मागविण्यात आले आहेत. नुकसानीचे अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागामार्फत ते मदत व पुनर्वसन विभागाला पाठविले जाणार आहेत. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार नुकसानग्रस्तांना मदतीची घोषणा होईल. पण, अजूनही काही जिल्ह्यातींल पंचनाम्याचे अहवाल मिळाले नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली. दरम्यान, ओला दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात होतो. परंतु, मंत्रिमंडळ अस्तित्वात नसल्याने त्यासंदर्भात काहीच हालचाली सुरु नसल्याचेही मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी यावेळी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. होटगी (ता. दक्षिण सोलापूर) व मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतीपिकांचेही अतिवृष्टीने नुकसान झाले आहे.

विदर्भात केंद्रीय पथकाकडून पाहणी

जुलै महिन्यात विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांत अतिवृष्टीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाकडून नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे. आता कृषी विभागाने बागायती, जिरायती क्षेत्रावरील कोणत्या पिकांचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे आणि त्यात फळबागांचे क्षेत्र किती आहे, याची माहिती मागविली आहे. पण, राज्य सरकारकडून अद्याप नुकसानग्रस्तांना मदतीची घोषणा झालेली नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली, परंतु, तशी परिस्थिती नसल्याचे मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी सांगितले.

मदतीचे निकष (प्रतिहेक्टरी)

६८०० रुपये - जिरायती

१३,५०० - बागायती

१८,००० - फळबागा

१४.९९ लाख हेक्टर - एकूण नुकसान