गडहिंग्लज: राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरातून राष्ट्रीय एकात्मता व तरुणांची कार्यक्षमता जपली जाते. भावी सक्षम नागरिक घडण्यासाठी आजच्या युगात अशा प्रकारच्या श्रमसंस्कार शिबिराची खरी गरज आहे. विद्यार्थ्यांना आता शिक्षणाची संधी सर्वत्र उपलब्ध होत आहे. मात्र आजच्या काळात विद्यार्थी हा शारीरिक श्रमापासून दूर जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खरेतर श्रमाशिवाय संस्कार होत नाहीत आणि जीवन घडत नाही यासाठी विद्यार्थ्यांनी श्रमाचे मोल वेळीच जाणले पाहिजे. आणि आचरणात आणले पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या “माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, राष्ट्रभक्ती, सेवाभाव व शिस्त निर्माण करणे हाच मुख्य हेतू समजून व उमजून घेऊन युवकांनी समाजातील विविध समस्या ओळखून त्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी केले. कौलगे ता.गडहिंग्लज येथे शिवराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एस एम कदम होते. तर माजी जिल्हा परिषद सदस्य श्री गणपतराव विठ्ठल डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ जी जी गायकवाड यांनी केले.
या उदघाटन कार्यक्रमात प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, प्रा.सौ.पौर्णिमा दिग्विजय कुराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री गणपतराव डोंगरे, श्री राजाराम पोवार, सरपंच भाऊ धोंडीबा कांबळे, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवाजी भैरू जाधव, ज्योती संजय गाडे, रेखा नेताजी देसाई, सुनिता नंदकुमार पाटील, धोंडीबा सत्यापा वडर, रामचंद्र मगदूम, कृष्णा भाऊ पाटील, विजयकुमार देसाई, महाविद्यालयातील प्रा. के जी अदाटे, ग्रंथपाल संदीप कुराडे, संजय कुपेकर, प्रा.आशा पाटील प्रा. लोहिता माने यांच्यासह ग्रामस्थ, एन.एस.एस.चे शिबिरार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डी. यू. जाधव यांनी केले तर प्रा.डॉ.एस.डी. सावंत यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.