गडहिंग्लज :निवासी शिबिराच्या माध्यमातून उज्वल भारताच्या सामर्थ्यासाठी युवक तयार होतो. तरुणांच्यामध्ये गाव आणि शहर या विषयी महात्मा गांधीजींनी सांगितलेली खेड्यातील संस्कृती रुजायची असेल तर अशा शिबिरांची आवश्यकता असते. या वयातच विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळत असते. त्यासाठी या ठिकाणी घेतले जाणारे सर्व उपक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी प्रेरणादायी ठरतात. या सात दिवसांच्या शिबिरांमधून आयुष्य घडविण्यासाठी आवश्यक उर्जा युवकांना मिळत असते. विद्यार्थ्यांनी त्याचा पुरेपूर वापर करून घ्यावा असे असे प्रतिपादन तहसीलदार श्री ऋषिकेत शेळके यांनी केले. बडयाचीवाडी येथे आयोजित संभाजीराव माने ज्युनिअर चे एन.एस.एस.चे विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे संचालक श्री एम.के.सुतार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार श्री शेळके पुढे म्हणाले- श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांना घडण्याची संधी प्राप्त होते. विद्यार्थ्यांना एक प्रकारची शिस्त मिळते. ही शिस्त विद्यार्थ्यांना जीवनात अत्यंत मोलाची ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यानी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून मिळणाऱ्या संस्कारातून आपले जीवन घडवावे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये आम्हा सर्वांची जडण-घडण अशा शिबिरातून झालेली आहे. या शिबिरातून नव तरुणांना समाजसेवेचे बाळकडू दिले जाते. आजच्या विद्यार्थ्यांना श्रमसंस्काराचे महत्व वेळीच कळले पाहिजे. श्रमसंस्काराची ताकद जीवनात किती महत्वाची आहे. हे विद्यार्थ्यांना समजले पाहिजे यासाठी अशा उपक्रमांची खरी गरज आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी शिवराज विद्या संकुलाच्या संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांनी विद्यार्थ्यांना समाजसेवेची गाणी शिकविली. यावेळी प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांची गडहिंग्लज नगरपालिकेच्या नगरसेविकापदी निवड झाल्याबद्दल बडयाचीवाडी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच श्री बाजीराव खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच श्री बाजीराव खोत, उपसरपंच श्री वसंत पोवार, ग्रामसेवक श्री संदीप तोरस्कर, श्री संतोष राक्षे आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा.संजय कांबळे, प्रा.सौ.एस.एन.जांगनुरे, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी केले. शेवटी कु. प्रियांका चौगुले यांनी आभार मानले.